एका मनाची गोष्ट

मन आकाशी उडते
थोडे दिशाहीन जरी
मन पाण्यात पोहते
घेई लाटा अंगावरी
मन ओथंबून वाहे
संगी पावसाच्या सरी
मन वेगाने धावते
सुटे लगामाची दोरी
मन बोलते हळुवार
स्पर्श कापसाच्या परी
मन ऐकते मनाचे
गूढ दाटले अंतरी
मन नाजूक ते किती
शब्द लागती जिव्हारी
मन निर्मळ निर्मळ
पाही देवाला देव्हारी
मन चाले विना वहाण
जरी सूर्य डोईवरी
मन ठेवले गहाण
खोट्या आशेच्या बाजारी
मन एकटे एकटे
त्याचा सखा ना सोयरी
मना वाटे बोलावेसे
केली आढ्याशीच यारी

नको जाऊ रे मना उगा वाटेवर अश्या
पायी काटे रे अनेक अन वाट ती अंधारी

अस्तित्व

चला उद्याची बोली लावू खेळ आजचा संपला
पुन्हा द्रौपदी द्यूत सभेत बोलविते कृष्णाला
सभेत सारे मौन जाहले कुणि न देतो न्याय
शतकापासून धरती सारे अजाणतेचे पाय
वेळ संपते काळ संपतो कधी न जाती भोग
मानवातील मानवतेला दुर्बळतेचा रोग
मुके राहुनी वाटे त्यांना युद्ध जिंकलो आपण
कळे कधीना होऊन जाते वृक्षाचे सरपण
असेच पडते आयुष्याचे पाऊल शेवटचे
कर्म करोनि फळे खावया नाही मिळायचे
मग हताश होऊनि नजर थांबते आढ्यावर
झाले कसले दुःख अन रागवावे कुणावर
जे जे सुलटे टाकत गेले उलटे पडले पासे
कर्तृत्वाच्या पाउलखुणा शोधती अस्तित्वाचे ठसे

तुझ्यात नि माझ्यात

तुझ्या माझ्या एकांतात रातराणी हळूच लपते
पानामध्ये अलगद लपून फक्त गंध पसरवते

तुझ्या माझ्या एकांतात धूप निवांत जळतो
उगवलेला पौर्णिमेचा चंद्रसुद्धा ओशाळतो

तुझ्या माझ्या एकांतात श्वासांचे शब्द बोलतात
पहाटेची दवबिंदू एकमेकातच मिसळतात

तुझ्या माझ्या एकांतात तुझ माझं काहीच नाही
फुलापासून गंध वेगळा कधी झालाच नाही

तुझ्या माझ्या एकांतात झुरते डोक्यावरची आठी
तृप्त होऊन आभाळ घालत धरणीला मीठी

तुझ्या माझ्या एकांतात मग होते सुखाची बरसात
एकांत पण थांबून विरघळतो तुझ्यात नि माझ्यात

कसे ? कसे हसायचे ? ( आरती प्रभू )

कसे ? कसे हासायाचे ?
हासायाचे आहे मला

हासतच वेड्या जिवा
थोपटीत थोपटीत
फुंकायाचा आहे दिवा

हासायाचे
कुठे ? कुठे आणि केव्हा ?
कसे ? आणि कुणापास ?
इथे भोळ्या कळ्यांनाही

आसवांचा येतो वास

मी खरेच दूर निघालो आहे ( ग्रेस )

मी खरेच दूर निघालो आहे
तू येऊ नको न मागे
पाउस कुठेतरी वाजे
हृदयाचे तुटती धागे
शेतावर ढग अडलेला
घे त्याला मागून पाणी
झाडावर कोकीळ येता
घे मागून एक विराणी
या फुलपाखारांनाही
ते उरेल मरणावाचून
सगळ्याच ऋतूंना मिळते
दु:खाचे उत्कट दान…
भरपूर सोडली आहे
पडवीत निजेला जागा
अन दूर तुझ्याहून दूर
प्राचीन फुलांच्या बागा…
थिजलेल्या वेळुनमधला
लागटेल तुलाही वारा
पाउस थांबल्यावरही
ताऱ्यांच्या पडतील गारा…
उध्वस्थ मंदिरे येतील
नजरेत तुझ्या दीप्तीने
खंडानंतर करते पक्षी
दिसतील तुला तृप्तीने…
माझ्याहून गर्द मिठीचा
अंधार गळ्याला येईल
शिल्पास रूप देणाऱ्या
हातांचा विळखा होईल…
तळहातावरचा फोड
फुटणार अशा अनुरादे
वेदनेस नसते वीण
पडछाया तुडवीत जाणे
अंगाईत फक्त मुलांना तू सांग एवढे गाणे…!
-ग्रेस

स्वप्नांची समाप्ती ( विशाखा ,कुसुमाग्रज )

स्नेहहीन ज्योतीपरी
मंद होई शुक्रतारा
काळ्या मेघखंडास त्या
किनारती निळ्या धारा

स्वप्नासम एक एक
तारा विरे आकाशात
खिरे रात्र कण कण
प्रकाशाच्या सागरात

काढ सखे, गळ्यातील
तुझे चांदण्याचे हात
क्षितिजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत

रातपाखरांचा आर्त
नाद नच कानी पडे
संपवून भावगीत
झोपलेले रातकिडे.

पहाटेचे गार वारे
चोरट्याने जगावर
येती पाय वाजवत
वाळलेल्या पानांवर

शांति आणि विषण्णता
दाटलेली दिशांतून
गजबज गजवील
जग घटकेने दोन

जमू लागलेले दव
गवताच्या पातीवर
भासते भू तारकांच्या
आसवांनी ओलसर

काढ सखे, गळ्यातील
तुझे चांदण्याचे हात
क्षितिजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत.

प्राजक्ताच्या पावलाशी
पडे दूर पुष्प-रास
वाऱ्यावर वाहती हे
त्याचे दाटलेले श्वास

ध्येय, प्रेम, आशा यांची
होतसे का कधी पूर्ती
वेड्यापरी पूजतो या
आम्ही भंगणाऱ्या मूर्ती!

खळ्यामध्ये बांधलेले
बैल होवोनिया जागे
गळ्यातील घुंगरांचा
नाद कानी येऊ लागे

आकृतींना दूरच्या त्या
येऊ लागे रूप रंग
हालचाल कुजबूज
होऊ लागे जागोजाग.

काढ सखे, गळ्यातील
तुझे चांदण्याचे हात
क्षितिजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत

प्रकाशाच्या पावलाची
चाहुल ये कानावर
ध्वज त्याचे कनकाचे
लागतील गडावर

होते म्हणून स्वप्ना एक
एक रात्र पाहिलेले
होते म्हणून वेड एक
एक रात्र राहिलेले.

ओततील आग जगी
दूत त्याचे लक्षावधी
उजेडात दिसू वेडे
आणि ठरू अपराधी!

-कुसुमाग्रज

माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली (वैभव जोशी )

कशासाठी आता पुन्हा भेटायाचे सांग
देणे घेणे उतू गेले फिटले ना पांग
आता कशी श्वासांवर लावायाची बोली
माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली

कधीकाळी होते इथे एक गर्द रान
एका बहराची ज्याने मिरवली आण
सरूपाला अरुपाची जाहली सवय
तेंव्हाचे हे भय ज्याचे झाले आता वय
एका खिळ्यासाठी कुणी जोपासावी ढोली
माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली

आता माझ्या प्रार्थनेत तेवढा ना पीळ
आणि तुझ्या निळाईत नाही घननीळ
मंदिराच्या मंडपात मशिदीचा पीर
जीव ऐलतीर आणि डोळे पैलतीर
कोरड्या पात्रात उभी आठवण ओली
माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली

– वैभव जोशी

मुखवटा

भेद माझ्या मनीचे ह्या जगा कळलेच नाही
रंग नेमका कोणता आरश्या दिसलेच नाही
थांबले ज्या वळणावर ते पुढे वळलेच नाही
गाव सोडून मागचा जाणे पुढे जमलेच नाही

शब्द खोटे रंग खोटे दुनियाच ही फसवी असे
जायचे कोणाकडे सारीकडे मृगजळ दिसे
एकटा फिरतो उन्हाचा होऊनि कासावीसे
त्यासी देण्या एकही थेंब पाण्याचा नसे

जे मला जमलेच नाही ते कराया लागले
वाळलेल्या पाकळ्याना कैक रंगे रंगिले
आसवांना शुष्क करुनि नेत्रदलही आटले
अन कोरडया नेत्रांच्या पापण्याही सुकवले

दुःख होते कामनांचे अदृश्य सारे ठेवले
सुख सांगी ज्यास सारे ते समोरी आणले
वागले जैसे जयाला रुचले अन भावले
पाषाण झाले अंतरी पाश तरी न सोडले

क्षण सुखाचे घेत गेला काळ मोठा चोरटा
देत गेला रोज एक नवनवीन मुखवटा !!

कधी माझी कधी त्याचीही साऊली ( आरती प्रभू )

ही कविता श्री आरती प्रभू ( चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ) ह्यांनी रचलेली एक अप्रतिम रचना आहे . ह्यातील शब्द भारावून सोडतात. कधी कधी आपण जे बोलतो ते समोरच्याला अवगत होत नाही आणि कधी कधी न बोलता सगळं काही स्पष्ट समजून घेतल्या जात. ही कविता त्या मूक शब्दांची आहे जे कधीच बोलल्या गेले नाहीत . ह्यातील दोन ओळी ” गहाण शेताचे आम्ही दोन धनी , दूध दाण्यातले राखतो इमानी ” ह्या ओळींनी मला खरंतर भारावून सोडलं आणि त्यांना व्यक्त कराव्या इतकी माझी कुवत नाही , त्या ज्याने त्याने आपल्याच समजून घ्यावा !!!

कधी माझी कधी त्याचीही साऊली
रेंगाळे माझिया चोरट्या पाऊली

कधी त्याच्या पायी उठे ठसा
कधी मला त्याच्या प्राणाचा आरसा
चारी डोळ्यातून दोघेही जागतो
दारी तोही कधी पणती लावतो

ऊन मिठपाणी काजळाच्या मागे
भिजे माझा पीळ त्याचे धागे धागे
वाळू घातलेले माझे पांघरूण
कैसे ओढ त्याचे मावळेल उन्हं

एकाच घनाच्या दोन आम्ही सरी
प्राणावर एक , दुजी अंगावरी
गहाण शेताचे दोन आम्ही धनी
दूध दाण्यातले राखतो इमानी
मनाची गोफण तरी फिरताहे
कधी तो कधी मी उडू उडू पाहे

आरती प्रभू

कोण ही ?

मी रुसली तरी ती हसते
सुकले मी पण ती बहरते
कुशीत कधी येऊन बसते
कधी कवडसे उघडून देते

मी लाख सोडवले तिजला
ती सोडवेना तरी मजला
गुंफून देते मज शब्दमाला
पंख जणू मिळे विहंगाला

पण एकदा ती रुसली
का बरे मी रागे भरली ?
दूरदेशी जाऊन बसली
कितीतरी मी हाक लावली

बोलली वचन मज हवे
पुरे सारे तुझे ते कांगावे
तुझ्यात मी सदा राहावे
माझ्याविना तू कसे जगावे ?

मी तव भावनांची सरिता
तूझ्या अंतरातली ललिता
जगते मी तुझ्याकरिता
मीच असे तुझी “कविता”

Design a site like this with WordPress.com
Get started