समुद्रातून येणाऱ्या लाटा खरच त्याच्याच का ?
का ते उफाळून आलेलं तारुण्य आहे त्या नदीचं
जे सळसळत अडखळत धडपडत उंचावरून
खाली येतं ,
अनेक गाळ सोबत घेऊन , सार्यांना धुडकारून
असंख्य अपमान सहन करून
जोमाने आलेलं ते कौमार्य
त्या विशाल , अनाकलनीय सागराला बिलगत
मात्र हरवून बसते ती आपलीच ओळख
आणि मग तीच शोधायला
लाटांच्या आधाराने
सतत किनाऱ्यावर येऊन परतते
पण कुठे ? तिला न आता तिचा रंग
न तिची चव !
आहे तो फक्त खळखळणारा उद्वेग
आयुष्याची वाफ करून पुन्हा
पूर्ववत होण्याची एक इच्छा !!
असंख्य लाटा कुठून येति समुद्रितटा
दिसे का त्यातून ती अवखळ सरिता
उंचावरून ती खाली येते सातत्याने
झेलत येते मग अगणित अवमाने
झुरते खळखळते अडखळते भंगुरते
ऊन पावसा सोसून तरीही नित्य वाहते
बिलगून जाते संथ होऊनि सागराला
झोकून देते हाती त्याच्या कौमार्याला
अस्तित्व तिचे नच उरले कोठे आता
भांबावते एक जरासे मागे वळता
कोण मी ? कुठली मी ? कशी मी ?
नाव कोणते होते माझे सांगा तरी स्वामी
अनुत्तरित सारे काही हताश ती सरिता
होई सागराची भार्या ती शैलाची दुहिता
नच थांबे हा उद्वेग कधीही हेच एक उत्तर
होऊनि लाटा कोसळते मग सागरतीरावर