गुलाबाची बाग

थांबवलस का ?
निरंतर सुरू असलेल्या एकाकी वादळाला
चाळीशीच्या उंबरठ्यावर येऊन रोकलस का ?
त्या अगणित खिडक्या
सगळ्या बंद केल्यास का ?
दिसतोय का कुठून उन्हाचा एकच किरण
म्हणून सारं काही झाकल का ?

डोळ्यावर झापड लाव ,
प्रकाशाच्या त्रासाने डोळे ओलावतील
आयुष्याची सारी जमापुंजी वाहून नेतील
म्हणून काळ्या गर्द रंगाचे पडदे लावलेस का ?

हे सगळं नाही केलस का अजून ?
म्हणजे जीव अजून बाकी आहे
फक्त श्वास सुरू नाही तर
थोडी आस बाकी आहे
गुलाबाच्या बागेत काट्यासाकट चालताना
रक्ताळलेल्या पायाकडे फक्त बघायचं 
शास्त्र समजून , आणि
जिवंतपणाची अनुभूती घ्यायची !!

कुछ ऐसे ही….

भागती है जिंदगी हात मे आती नही
जो छूट गया वो फिर छूने देती नही

मांगती है हिसाब हर एक निवाले का
यहां  रोटी अपनी कीमत छोडती नही

पहले टूटा सपना या नींद टूटी थी
इस बात से हकीकत बदलती नही

झुठ नहीं है कुछ भी न आंसू न हँसी
जिस पल मांगा जिसे वो मिलता नही

कुछ तो होगा आसमान के उस पार
युही बार बार नजर उधर जाती नही

बदलते रंग दिखते है बस ऊपर से
नियत का रंग किसीको दिखता नही

पढ़ पढ़ के चेहरे थक जाती है आंखे
लिखने के अलावा कुछ सूझता नही

सुकलेल्या कळ्या

फुलतिल कधी म्हणुनी
ठेवल्या कळ्या जपुनी
फूल झाले कधीच नाही
सुकल्या तशाच त्याही

ठेवले बंद कवडसे
माळ्यावरी जरासे
अंधारले तसेच तेही
चंद्र दिसलाच नाही

मिटले हळूच डोळे
मन सोडले लव्हाळे
तृणास इवल्या त्याही
दवबिंदू सोसत नाही

हो पाखरु म्हणुनी
जावे उंच उडुनी
आकाश त्यास नाही
पंखास अर्थ नाही

वाहुदे असेच सारे
कोरडे ग्रीष्म वारे
ओल्या आठवणींनाही 
द्यावे न मोल काही !!

समांतर रेषा

आलो किती दूर दूर
बोले रेषा समांतर
अन केव्हाचे चालतो
बघ ठेवून अंतर

कधी वाटले येईल
पुढया वाटेत वळण
मला मिळेल आसरा
तुझ्या मिठीत येऊन

चल थांबुया का थोडे
जीव फारच दमला
कण कण आसवांचा
बघ गाली ओघळला

मग बोले दुजी रेष
भेटू आपण खरेच
हात हातात घेऊन
झाले दिवस बरेच

सांग भेटायचे कुठे ?

निळया सागर तळाशी
का मोकळ्या आकाशी
भेटू बागेत चंद्राच्या
का कवेत सूर्याच्या

साऱ्या काल्पनिक जागा
आहे ठाऊक मला
भेट तुझी अन माझी
जन्म देते कल्पनेला !!

नात्यास नाव अपुल्या…(कुसुमाग्रज )

नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही
साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही

ना ताल राग यांच्या बंधात बांधलेला
स्वर मेघ मंजुळाचा बरसे दिशांत दाही

गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा
मंजिल की जयाची तारांगणात राही

शेवटचे पान

नित्यक्रमे सांगत राहे मावळतीचा सूर्य बहाणे
किती यत्ने केली तरीही अर्धे मुर्धे एकच गाणे
पूर्ण कराया एकच ओळ एकच मुखडा नि तान
सरून जातो दिवस देऊन अर्ध्या गीताचे दान
काळातून सुटलेली गीते वेळेने मग उचलून धरले
पूर्णत्वाला घेऊन जाण्या असे कसे रे सारे चुकले?
ह्या कवितेच्या वहीचे आता शेवटचे हे पान राहिले
शब्द अजून संपले नाही  गाणे आजही अर्धे उरले

आयुष्याचे उनाड प्रश्न टाकून दिवस निघून जातो
करायचे जे होतच नाही अर्धे उत्तर सोडून निजतो
सारे काही तसेच ठेवून भार उद्याचा वाढत असतो
आज तरीही जगतच नाही इतुके सोपे कसे वागतो ?
तरीही मिटतो डोळे आशेची एक सकाळ बघतो
अर्ध्या पूर्ण जीवनाचा खेळ असाच खेळत जगतो !!

उन्हं

एकदा भिजवून पाऊस परका होतो नेहमीच
म्हणून तिने वाळवंटाच्या शेजारी घर बांधलं
जिथे अश्रू पण कोरडे होऊनच बाहेर येतात
अश्याठिकाणी तिला जास्त समाधान मिळालं
ओल्याचिंब क्षणांना सोडून कोरड्या वाळूत
ओसाड एकांताशी तिला बोलावसं वाटलं
पावसाच्या धारा,आणि त्याचा चिखल नकोय
म्हणून तिने मृगजळाकडे टक लावायचं ठरवलं
तस हाती काहीच येणार नाही हे ठाऊक होतं
पण थिजलेल्या भावनांना तिने मोकळं केलं

झगा

दिवसभराचा थकलेला बाईचा झगा
जेव्हा खुंटीवर जाऊन बसला
मनातच विकृत हसला ,
शरीराला म्हातारपण येत
मला का नाही येत ?
त्या बेफाम नजरा
अजूनही तश्याच आहेत
येताना जाताना लागणारा चिखल
कीतीही धुतला तरी तसाच निश्चल
मग कशीतरी वाट काढून
एकच जीव दहा वेळा जपून
आपल्या घरट्यात यायचं
आणि रोज हे असंच जगायचं
मग देवाकडे एकच इच्छा ठेवतो
झगा होईन पुढल्या जन्मी
पण घालायला पुरुष मागतो !!

वळीव

अवेळीच असा कधी पाऊस येतो
जन्मभराचा ओलावा कवेत आणतो
ओल्या थेंबाचा शिरवा साद घालतो
मंद मंद गारवा चिंब मातीत खेळतो
त्याचा नाद-खुळा दुरून खुणावतो
पण दिवा तुळशीचा दारात जळतो
मग येतो उंबऱ्यात नि तिथेच थांबतो
सारी सृष्टी भिजवून मन कोरडे ठेवतो

Design a site like this with WordPress.com
Get started