“असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला
राधेस जो मिळाला तो एकटाच उरला”
काही दिवसांपूर्वी ग्रेस ची एक खूप सुंदर कविता वाचली
” स्वर्गातला प्राजक्त ” आणि वाचतच राहिली. पूर्ण कविता तर अप्रतिम आहेच पण त्याच्या शेवटच्या दोन ओळींनी मला भारावून सोडलं “असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला
राधेस जो मिळाला तो एकटाच उरला”. एखादी अशी काही रचना वाचावी आणि ती सतत आपल्या मेंदूत फिरत रहावी असं फार क्वचितच होत नाही का ? आणि त्यातून ते ग्रेसांनी लिहिलेलं , म्हणजे काही बोलालयलाच नको. त्यांच्या कवितेवर आपण विश्लेषण करणं म्हणजे दिव्याने सूर्याची आरती करण्यासारखं आहे , पण तरीही ह्या दोन ओळींवर खूप बोलावसं वाटतय . पूर्ण कविता वगळता ह्या दोन ओळींचे मी माझे अर्थ काढले .
इतक्यातच सद्गुरूंचा एक लेख वाचला त्यात ते म्हणतात ” beauty of poetry lies in its deceptions ” हे वाक्य माझ्या मनाला कुठेतरी आत जाऊन भिडल , अक्षरशः डोळ्यातून अश्रुधारा अशा काही येऊ लागल्या जस काही आत एक धरण फुटल आहे. सद्गुरूंचे हे वाक्य ग्रेसना अगदी फिट बसतात .
His poems are not difficult but deceptive . अशे बरेच कवी आहेत पण कदाचित ह्या दोन गोष्टी मी १ -२ दिवसाच्या अंतरात वाचल्यामुळे मी ग्रेस च नाव घेतलं
त्या 2 ओळींचे मी माझे लावलेले अर्थ
1 यमुना नदी म्हणजेच कालिंदी ह्या नदीचा उल्लेख फक्त कृष्णासाठी केला असणार नाही का ? अनेक स्त्रियांनी त्या कृष्ण नावाच्या प्रवाहात वाहून जाण्याची कामना केली असणार पण त्याचा प्रवाह थांबला तिथे जिथे राधा होती आणि तो एकटाच होता जो राधेला कळला , बाकी सगळ्या त्याच्या प्रतिकृती होत्या.
2 रुक्मिणी आणि सत्यभामा दोघीचं कृष्णावर अपार प्रेम होतं , पण दोघीनी त्याच्यावर आपला हक्क जमवण्याचा हट्ट धरला , राधेने मात्र त्यावर निःस्वार्थ प्रेम केलं, हे ठाऊक असूनही तिला स्वतःला समर्पित करण्याची मुभा त्याला नव्हती आणि म्हणूनच मनोमनी तो नेहमीच एकटा राहिला
3 दिसणार्यांना राधा- कृष्ण जरी वेगळे दिसत होते तरी ते एकमेकांत विलीन झाले होते, पाहणाऱ्यांना फक्त कृष्ण आणि त्याच्या लीला दिसत होत्या , पण त्यातली राधा दिसली नाही ती त्यात एकरूप झाली होती म्हणूनच , राधेस जो मिळाला तो एकटाच उरला
माझी ही विवंचना इथेच थांबली नाही , मन धावत सुटलं , मी विचार करत बसले , कृष्ण मथुरेला निघून गेल्यावर राधेच मनोगत काय असेल ? त्याच्या शेवटच्या भेटीत त्याने तिला काही वचन दिले असणार का ? की फक्त ” लाख चूका असतील केल्या केली पण प्रीती ” अस म्हणून निघून गेला असणार . त्यानंतर तिची होणारी कुतरओढ त्याला जाणवली असणार का ? तिने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असणार का ? अशी अनेक प्रश्न माझ्या मनात येतात , कारण माणसाला देवपण देऊन आपण त्याच्या भावनांचा निचरा करतो आणि देवाला पुन्हा कधीच माणूस बनू देत नाही .
राधेचे मनोगत :-
माझ्या अपेक्षांचं ओझं मी तुझ्यावर कधीच लादणार नाही कारण तुझ्या कर्तव्यांच ओझं तुला पुरेसं आहे. मी तुला सामोपचाराने मोकळं करणं हीच माझ्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे. ” दोन ओंडक्यांची होते सागरात भेट , एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ ” हे जरी खरं असलं तरी मी तुझ्यातला एक अविभाज्य घटक आहे हे तुला नाकारून चालणार नाही, तुझ्यापासून स्वतःला वेगळं करणं हे मला ह्या जन्मात काय तर पुढल्या अनेक जन्मात शक्य नाही. मी तुझ्या शरीराशी नाही तर आत्म्याशी समागम झाली आहे , मला तुझ्यावर माया करायला तूझ्या आज्ञेची , इच्छेची , सहमतीची गरज नाही. तू पुढे हो , तुझ्या कर्तव्याची दालनं तुझी वाट पहात आहेत. पण एक प्रश्न मात्र स्वतःला विचार , ज्या नात्याला आपण भविष्य दिल नाही त्यात आपण इतक का गुंतलो ? मी स्वतःला विचारलं आणि उत्तर एकच , तू माझ्यातून आलेली अनुभूती आहेस आणि मी तुझ्या अस्तित्वाचा एक भाग , तुझ्यामुळे मी श्वास घेते .
माझ्या अतिसामान्य अश्या व्यक्तिमत्वातल्या “ती”ला बाहेर काढून तू मला असामान्य बनवलस आणि आता त्याच तिला सोडून जाताना मी तुला अडवू शकत नाहीं . कारण असामन्यांतून सामान्यांकडे प्रवास मला मान्य नाहि . आणि म्हणूनच तुझ्या कर्तव्यपूर्तीच्या प्रवासात मी तुला मोकळं करते . समाजाला त्यांचा श्रीकृष्ण देऊन माझा सखा मी मजपाशी ठेवते , कारण ” राधेस जो मिळाला तो एकटाच उरला ”
तू सोडून जाताना ,मी क्षणभर निमूट झाले
अंतर्मनी का बांध भाव भावनांचे सुटले
तू निरोप घेता माझा मज गूढ हे उलगडले
बोल होते मनीचे मनातच राहिले
वेळ होती संपली का शब्द अपुरे पडले
का होते ते सारे शब्दांच्या पलीकडले
नाही मी तव भार्या हे जरी उमजले
कृष्णाहून राधा वेगळी का झालें ?
माझ्याच मनीचे फुल कृष्ण वेली फुलले
म्हणून मी ही राधा अनुपेक्षित ठरले
तू एक शाश्वत ज्यासी अंत न उरलेले
जे ठाव मला ते कुणा न कळलेले
यशोगाथा तुझी
ऐकेन तुझ्याच कानी
जा सखा तू श्रीकृष्ण हो ,
वसे राधा अंतर्मनी
ऋतुजा